Wednesday, November 18, 2015

सहकार आणि महाराष्ट्र

क्यालिफोर्नियातील आवाढव्य म्हणता येईल अशा संगणक कंपनीच्या वातानुकुलीत पंचतारांकित कार्यालयात बसून गावाकडील आठवनीने तो अंतर्मुख झाला. काही क्षण शून्यात घालवले आणि आठवणीतून बाहेर यायचा प्रयत्न करू लागला पण जमले नाही. त्याला गावाकडील आठवणीतच रमायचे होते. कुणाचाच व्यत्यय नको होता. कारण माणसाला आपण कुठे आलोय यापेक्षा आपण कुठून आलोय हि उंची मोजण्याची इछा नैसर्गिकच असते. तो शून्यात नजर ठेऊन उंची मोजत बसला. त्याला त्याचा दोन गुंड्या शिल्लक राहिलेला मळलेला सदरा आणि कर्दुड्याला छोटीशी तुराटीची काडी गोल गोल फिरवून फ़िट्ट बसवलेली चड्डी आठवली. हातात कुठलीतरी "सारडा क्लोथ सेंटर" वैगरे लिहिलेली किंवा कळकटलेली तारेची पिशवी घेऊन तो शाळेत जात असे.  त्याच काळी त्या भागात साखर कारखाना निघणार म्हणून लोक खुशीत होते. कारखाना येईल, ऊस पिकेल आणि सात पिढ्याचे दारिद्र्य निघून जाईन या आशेने लोक आंनद साजरा करत होते. पण याच्या वडिलांना आणि त्याला खुश व्हायला तेवढी सांध सापडत नव्हती कारण त्यांच्याकडे शेतंच नव्हते. मग काय फायदा ?  त्यावेळी तो आनंदी होऊ शकत नव्हता कारण तेव्हा त्याला कळत नव्हते कि जेव्हा एखादी सहकारी संस्था येते तेव्हा ती फक्त समाजातील एकाच घटकाचे कल्याण करत नाही तर समस्त समाजाचा कायापालट करण्याची ताकद सहकारामध्ये असते. काही दिवसातच त्याच्या वडिलांना नवीन झालेल्या साखर कारखान्यावर कामगार म्हणून घेतले आणि तो नोकरदाराचा मुलगा झाला . त्याच साखर कारखान्याने शाळा काढून पंचक्रोशीतल मुलामुलींची शिक्षणाची सोय केली. आयुष्यात कधी विचार केला नव्हता अशा अभियांत्रिकी कॉलेज मध्ये शिकण्याचे भाग्य त्याला मिळाले ते त्याच साखर कारखान्याने काढलेल्या कॉलेजमुळे.   कधीकाळी इंजिनीअर आणि डॉक्टर होणे  हा फक्त मुंबई पुण्यांच्याच लोकांचा मक्ता होता ते शिक्षण ग्रामीण भागात उपलब्ध करून देऊन सामान्य मराठी जनतेची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती करण्याचे काम ह्या साखर कारखानदारीमुळेच शक्य झाले. आज तो त्याच्या दीड लाख रुपयाच्या ल्यापटोप समोर बसून विचार करतोय कि त्याच्यासारखे लाखो नाही करोडो शेतकऱ्यांची मुलं, मुली पुणे, बेंगलोर, हैदराबाद आणि युरोप अमेरिकेत भारताचे नाव रोशन करत आहेत. खऱ्या अर्थान सुशिक्षित आणि विकसित महाराष्ट्राचा पाया साखर उद्योगानेच रोवला आहे.


अमेरिकेत बसून भूतकाळात जाताना त्याच्या मनात, त्याचे आणि महाराष्ट्राचे वर्तमान आणि भविष्य बनवणाऱ्या साखर उद्योगाच्या इतिहासाची उजळणीच चालू झाली. १९१९ मध्ये महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना "बेलापूर शुगर"  श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव इथे झाला आणि काही शेतकर्यांनी एकत्र येउन माळीनगर इथे जोइन्त स्टोक कंपनी काढून १९३२ साली शेतकर्यांच्या मालकीचा कारखाना चालू झाला.    खाजगी साखर कारखान्यापासून चालू झालेला प्रवास सहकारापार्यंत घेऊन जाण्याचे श्रेय डॉ. धनंजयराव गाडगीळ आणि पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांना द्यावे लागते. १९४८ साली ह्या धुरिणांनी पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे उभा केला. त्यानंतर मा. यशवंतराव चव्हाण, मा. वसंतराव नाईक, मा. वसंत दादा पाटील, मा. शंकरराव चव्हाण, मा. यशवंतराव मोहिते  यांनी साखर उद्योगाला आणि सहकाराला अनुकूल धोरणे आखून हा उद्योग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्याचे काम केले. मा. शरदचंद्र पवार यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत नेहमीच साखर उद्योगाला आणि उद्योगावर आधारित लोकांना पूरक भूमिका घेऊन ती धुरा समर्थपणे सांभाळली आणि आजूनही सांभाळत आहेत. ह्या थोर आणि दूरदर्शी धुरिणांनी मजबूत पायावर  उभ्या राहिलेल्या सहकाराच्या  वेलीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाउन शेतकर्यांच्या, मजुरांच्या आणि इतर साखर उद्योगावर अवलंबून असलेल्या करोडो लोकांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणला. खरे नेते, कार्यकर्ते निर्माण करत नाही तर ते नेतेच निर्माण करतात या न्यायाने सहकाराची धुरा खांद्यावर वाहणारे नेते प्रत्येक जिल्ह्यात,  तालुक्यात निर्माण केले.  साखर कारखानदारीमध्ये महाराष्ट्राला आर्थिक विकासाच्या शिखरावर घेऊन जायची ताकद आहे हे आधुनिक महाराष्ट्रातील नेत्यांनी ओळखले होते. कारण खरा विकास हा जनतेच्या हातात पैसा निर्माण करणारे छोट्या मोठ्या उद्योगांचे जाळे राज्यभर निर्माण करूनच होत असतो.  हे ह्या शेतकऱ्याच्या मुशीत तयार झालेल्या महाराष्ट्रातील नेतृत्वाला  चांगलेच समजले होते.

एक साखर कारखाना फक्त ठराविक कामगारांना रोजगार न देता तो त्यावर अवलंबून असलेल्या उसतोड कामगार, ट्रक मालक चालक, आणि आवतीभोवती उभी राहणारी व्यापारी संकुले यामार्फत पूर्ण तालुक्याचा विकास करतो.  महत्वाचे म्हणजे अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक असलेल्या शेतकऱ्याला स्वावलंबी बनवतो. अशा कोट्यावधी मराठी लोकांचा विकास केल्यानेच महाराष्ट्राला एक औद्योगिक राज्य म्हणून देशात वोळख मिळाली आहे. आज अखेर महाराष्ट्रात सुमारे १७० हून अधिक चालू सहकारी आणि खाजगी साखर कारखाने आहेत ज्यांनी ग्रामीण भागात करोडो लोकांना रोजगार पुरविला आहे. भारतासारख्या अफाट लोकसंख्या असलेल्या देशाला पाशिमात्या विकासाचे मॉडेल पुरणार नाही तर विकासाचे विकेंद्रीकरण करून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि भांडवल निर्मिती करावी लागणार आहे. आणि असे विकासाचे विकेंद्रीकरण करण्यात यश मिळाल्याने साखर उद्योग हा  ग्रामीण भागातून शहरात रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवण्यात यशस्वी झाल आहे. नाही तर आज महाराष्ट्रात शहरे बकाल, गर्दीने आणि गरिबीने भरलेली आणि गावे ओसाड दिसली असती. आज जर सहकाराशिवाय आणि साखर उद्योगाशिवाय महाराष्ट्राचा विचार केला तर पहिला प्रश्न उपस्थित होतो कि साखर उद्योगात गुंतलेल्या करोडो लोकांना रोजगार देण्याची क्षमता आपल्या शहरामध्ये आहे काय? उत्तर अर्थातच नाही असे आहे. याचवेळी याच सहकाराच्या आणि साखर उद्योगाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या शिक्षण संस्था मधून शिकून बाहेर पडलेल्या सुशिक्षित पिढीने देशाला उदारीकरनाच्या लाटेमध्ये टिकवून ठेवण्याचे काम केले आहे. एकीकडे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करून दुसरीकडे उदारीकानाला समर्थपणे तोंड देत शहरीकरणाचा एक अविभाज्य घटक म्हणजे सुशिक्षित आणि कुशल कामगार पुरवण्याचे काम पण ह्या साखर उद्योगानेच केले आहे.

आज पर्यंत महाराष्ट्रातील नेतृत्वाने  साखर उद्योगात राजकारण आणले, पण राजकारणामुळे तो उध्वस्त होणार नाही याची पण काळजी घेतली.  सहकाराचा पाया मजबूत करणाऱ्या ह्या धुरिणांनी गावोगाव फिरून वेळप्रसंगी स्वत:च्या जमिनी देवून, लोकांची जागृती करून हि मंदिरे बनवली. पण आज काही अपवादात्मक वाईट प्रवृत्ती यात घुसल्या आहेत. काही अपवादात्मक लोकामुळे आज साखर उद्योगापासून अनभिज्ञ असलेल्या लोकांना सहकारमहर्षि मध्ये साखर सम्राट दिसत आहेत,  शिक्षणमहर्षि मध्ये शिक्षणसम्राट दिसत आहेत. त्यांचे गैरसमज दूर करणे महत्वाचे आहे. ज्या उद्योगाने लाखो लोकांच्या घरातील चुली पेटवल्या त्या उद्योग्धन्द्यावर आज ऊस जास्त पाणी खातो म्हणून टीका करताना दोन वेळा विचार करण्याची तसदी सुद्धा काही विद्वान घेताना दिसत नाहीत. पाणी हि एक राष्ट्रीय संपत्ती आहे त्याचा वापर करून वाढवलेला ऊस हा त्या राष्ट्रीय संपत्तीची मुल्यवर्धीच करतो. कारण उसापासून साखर, इथिनोल, वीज, वेगवेगळ्या प्रकारची  केमिकल्स,  इंडस्ट्रीयल अल्कोहोल, मद्यनिर्मिती, चिपाडापासून पार्टिकल बोर्ड, मळीचे खत, तयार करून साखर उद्योग हा राष्ट्रीय उत्पन्नात भरच तर घालतोच, पण ऊस लागण करणारे मजूर, उस वाहतून करणारे ट्रक मालक-चालक, शेतकरी, साखर कामगार, साखरेची विक्री करणारे, कारखान्याला सुटे भाग आणि इतर माल पुरवणारे अशा ह्या उद्योगावर डायरेक्ट किंवा इंडारेक्ट अवलंबून असणाऱ्या लोकांच्या उदरनिर्वाहाची सोय पण करतो. त्याचप्रमाणे ह्याच उसाचा १५% हिस्सा हा जनावरांसाठी चारा म्हणून वापरला जातो. राज्यातील जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सुद्धा ऊस मदत करतो. वरील मुल्यावर्धी लक्षात घेता कोणताही चांगला अर्थतज्ञ आपल्याकडे असलेल्या राष्ट्रीय संपत्तीला म्हणजे पाण्याला कुजवण्याचा सल्ला देणार नाही.  उसा सारख्या पिकावर बंदी किंवा बंधने आणण्याची मागणी करताना आपण कल्पवृक्षावर बंदी आणण्याची मागणी करत आहोत हे सुद्धा लोक विसरून जातात. साखर कारखाने चालवायला खूप पाणी लागते हा एक लोकामध्ये पसरलेला खूप मोठा गैरसमज आहे. एक साखर कारखाना चालवायला खूप कमी पाणी लागते आणि तेच तेच पाणी रिसायकल करून पुन्हा वापरले जाते. लोकांची या विषयावर जनजागृती होणे आवश्यक आहे.

काळानुसार बदलायला पाहिजे. हे मानसासाठी पण लागू होते आणि उद्योग धंद्याला तर जास्तच लागू होते.  जागतिक स्पर्धेत आपले उद्योग टिकतिलंच पण वाढतील सुद्धा याची काळजी महाराष्ट्रातील साखर उद्योगात गुंतलेले लोक घेतील अशी अपेक्षा आहे. हा विचार त्याच्या मनात येतो. कारण उस हे एकंच पिक असे आहे कि शेतकर्यांना त्याचा मोबदला कोणत्याही मध्यस्था शिवाय त्याच्या खिशात पडतो. म्हणून तो अधिक असतो. तसेच गारपीट, अवकाळी पाउस ह्या असल्या धोक्यापासून ऊस हा सुरक्षित आहे आणि शेतकऱ्यांसाठी हमखास पैशाचे पिक आहे. शेतकर्यांना गरिबीतून बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे ऊस आणि साखर उद्योग.

आज ह्याच उद्योगातील अनुभवी आणि नवीन मंडळी खाजगी साखर कारखानदारीच्या माध्यमातून हा उद्योग जिवंत ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत ते म्हणजे काळ्या ढगाला असलेली चंदेरी किनारच म्हणावी लागेल. खाजगी साखर कारखानदारीच्या माध्यमातून उद्योग निर्माण करणारे पण शेतकऱ्यामधून आलेलेच अनुभवी लोक आहेत, जे ह्या  उद्योगाला नवीन उंचीवर घेऊन जातील अशी अपेक्षा आहे. जागतिक बाजारातील स्पर्धेत टिकण्यासाठी उत्पादकता वाढवणे हे ध्येय घेऊन पुढे आलेल्या ह्या लोकाकडून साखर उद्योगावर अवलंबून असलेल्या लोकांना खूप अपेक्षा आहेत. खऱ्या अर्थाने आज भारत साखर निर्यात पण करत नाही आणि आयात पण करत नाही पण भारताच्या १२० कोटी जनतेला पुरेल एवढी साखर सध्या भारतात बनते. त्यातील ४०% साखरेचा वाटा महाराष्ट्राने घेऊन भारतात आणि जगात महाराष्ट्राची मान ताट केली आहे.  परंतु अजून दहा वर्षाचा विचार करता भारताच्या वाढणाऱ्या लोकसंखेला साखर पुरवण्यासाठी साखर उद्योग  टिकलाच पाहिजे असे नाही तर वाढला सुद्धा पहिजे. ठीबक सिंचनाचे जाळे विस्तारून, कमी पाण्यात येणाऱ्या उसाच्या नवीन जाती निर्माण करून, ऑटोमेषण आणून हा रोगग्रस्त झालेला उद्योग पुन्हा उभारी घेऊ शकतो.

पण आजची स्थिती काय आहे ? त्याला माहित आहे, आजही अनेक साखर कारखाने खूप चांगल्या रीतीने चालू आहेत. पण भविष्यात ते नुसतेच टिकलेच पाहिजेत असे नाही तर त्यांची प्रगती पण झाली पाहिजे. साखरेला भाव न मिळाल्याने, कधी दुष्काळी परिस्थितीमुळे, कधी भांडवलाच्या कमतरतेमुळे तर कधी चुकीच्या व्यवस्थापनामुळे बंद पडलेले कारखाने पण त्याच्या डोळ्यासमोर येतात, त्या काही बंद पडलेल्या कारखान्यातील देशोधडीला लागलेला कामगार त्याच्या डोळ्यासमोर येतो. काम नाही, शिक्षण नाही म्हणून बेकार फिरणारा कामगाराचा मुलगा त्याच्या डोळ्यासमोर येतो, तीस वर्ष उलटून पण लग्नाची वाट बघत बसलेली साखर कामगाराची मुलगी त्याच्या डोळ्यासमोर येते, त्याच्या डोळ्यासमोर उस रानात वाळून चाललाय म्हणून डोळ्यात धड पाणी पण आणू न शकणारा आणि आतून खंगलेला शेतकरी येतो. कधीतरी हे कारखाने चालू होतील आणि त्यांच्या चुली पेटतील अशी त्याला अजून आशा आहे. कारण कोणतीच अडचण नवीन नसते. सगळ्या अडचणी जुन्याच असतात फक्त  आपल्याला उपाय शोधण्याची गरज असते. ते उपाय आपल्या आसपासच असतात.  शोधण्याचा प्रयत्न केला तर ते नक्की सापडतात.  आज वेळेतच जर आजारी पडत चाललेल्या साखर उद्योगावर उपाय  केले नाहीत तर हा उद्योग पण मुंबईतल्या कापड उद्योगासारखा इतिहास जमा झाल्याशिवाय राहणार नाही.  हा विचार करून तो बसल्या जागी अस्वस्थ होतो आणि तसाच विचार करत खुर्चीत बसून राहतो.

कथा समाप्त --- पार्श्वाभागामध्ये बदल.

शेवट - conclusion :

महाराष्ट्रातील साखर उद्योगाचा आढावा आपण तळागाळातून येउन साखर उद्योगाच्या माध्यमातून आज यशाची शिखरे चढत असलेल्या एका घटकाला केंद्रित ठेवून घेतला. कोणताही उद्योग, कोणतीही घटना किंवा कोणताही घटक हा माणूस केंद्रित ठेवून बघितला तरच त्याचे महत्व समजते. कथेच्या नायकच्या रूपाने आपण  साखर उद्योगाचा थोडक्यात इतीहास, आजची स्थिती , अडचणी, फायदे, त्याची गरज यावर प्रकाश टाकला.

गेल्या बेचाळीस वर्षापासून याग्रीकल्चरल डेवलपमेण्ट ट्रस्ट, बारामती हे, पाणी,  शेती आणि शेतीपूरक उद्योगांच्या विकासावर भर देऊन रोजगार निर्मिती आणि मुल्यावर्धी करत आहे.  शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या घटकांचा आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला चांगले  यश पण मिळत आहे. ग़रज आहे ती सर्वांच्या सहभागाची.

आज महाराष्ट्राची जीवनरेषा असलेला हा साखर उद्योग अडचणीतून जात आहे. तरीही ह्या उद्योगावर अवलंबून असलेले आणि हा उद्योग ज्यांच्यावर अवलंबून आहे असे महत्वाचे घटक, ह्या कल्पवृक्षाला असे संपवू देणार नाहीत अशी आशा आहे.   प्रशासन, केंद्र आणि राज्य सरकार आणि धोरण आखणारे नेते, शेतकरी, शेतकरी हितासाठी लढणाऱ्या संघटना,  कामगार, उसतोड मजूर, उस वाहतूकदार,  या सर्वांमध्ये साखर उद्योगाला लहान सहान लाटामधून तारून नेण्याची ताकद आहे.  आणि हे सगळे घटक मिळून ह्या उद्योगाला नवी उभारी देण्याचे काम करतील अशी आशा आज महाराष्ट्र आपल्याकडून बाळगून आहे.

जय हिंद जय महाराष्ट्र.

विकास मोहनराव गोडगे.


















No comments:

Post a Comment