Wednesday, September 23, 2015

गणपती

आम्ही म्हणजेज गाव असा आमच्या तरुण मंडळाचा आव असायचा. क्रिकेट असो, हॉलीबॉल असो, राजकारण असो आमचे तरुण मंडळच एक नंबरला असायचे. पण आम्ही आजपर्यंत गणपती बसवला नव्हता. गणपतीत रिकामे राहणे, लोकांच्या मिरवणुकीत धिंगाणा घालणे,  संध्याकाळी गणपती बघायला नटून बाहेर पडलेल्या पोरीवर लाईनी मारत फिरणे  इत्यादी इत्यादी कृत्ये करण्यासाठी आपण रिकामे म्हणजेच सडं आसलं पाहिजे यावर आमच्या बहुतेक सदस्यांचे एकमत असे.

पण आजकाल वरच्या गल्लीचा गणपती खूपंच मोठा होतोय आणि त्यांच्या गणपतीला गर्दी पण जास्त जमत असल्याने त्या मंडळाचा गावात वट्ट वाढत  होता. त्यामुळे आमच्या कार्यकर्ते मंडळीत जरा चलबिचल चालू झाली होती.  त्यात गेल्या वर्षी त्यांच्या गणपतीची चर्चा आमच्या गल्लीतल्या पोरी करत होत्या हि बातमी सांगून लंगड्या संत्याने कार्यकर्त्यांच्या असंतोषात आणखी भर घातली. आता एकूण आमच्या इज्जतीचा प्रश्न निर्माण झाला होता. मग एके रम्य संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी गावाबाहेरच्या टेकडीवर जमून तंबाखू मळत मळत आणि चघळत चघळत गणपती बसवण्याचा निर्णय घेतला. ह्या ठरावा नंतर  आमच्या लंगड्या संत्याने उभा राहून एक जोरदार शिट्टी मारून आनंद साजरा केला. हा लंगडा संत्या लय बिलींदर होता आणि गणपतीचा मोठा भक्त पण होता.

लगेच गणेश मंडळाचा अध्यक्ष, खजिनदार वैगेरे ठरवले गेले. एका खूपच उत्साही आणि कंडबाज कार्यकर्त्याचे दुकान होते त्याला खजिनदार केले. आता कुठे पैसे कमी पडले तरी तो त्यात भर घालणार हे आम्हाला माहित होते. घरटी शंभर रुपये वर्गणी जमा  केली. गल्लीत एक माणूस स्वतःला लय शहाणा समजत होता त्यांच्या घरी वर्गणी न मागता बहिष्कार टाकला. मग गणपती आणण्याच्या दिवशी त्याची बायको आली आणि स्वतः वर्गणी देऊन निघून गेली. मग आम्ही कशी जिरवली म्हणून एकमेकाला टाळ्या देऊन पाशवी आनंद साजरा केला.

दहा दिवस कार्यकर्ते एकदम खुश आणि मग्न होते. कुणीही मंडपात डाव खेळायचा नाही हे पथ्य पाळले होते. आय बाया यायच्या त्यांच्याबरोबर त्यांच्या पोरीपण यायच्या आणि आमचे कार्यकर्ते कॉलर ताईट करून मूर्तीजवळ किंवा बाजूला खुर्ची टाकून आपला मंडळात किती वट्ट आहे हे भक्तांना दाखवायचा प्रयत्न करायचे.
दहाव्या दिवशी मिरवणूक. मिरवणुकीवर ठरणार होते कि कोणत्या मंडळाचा गावात जास्त वट्ट आहे. मोठी बैलगाडी नारळाच्या फाट्यानि सजवली. गर्दी जमा करायचे तंत्र आम्हाला माहित होते. मंडळातील कार्याकार्त्यासाठी "OC" च्या पन्नास बाटल्या आणि बाकी गावातील म्हातारी कोतारी, बेवडी, आणि इतर मंडळी साठी हातभट्टीचे दोन मोठे दहा लिटरचे क्यान आणले होते.

बघता बघता रस्त्यात गर्दी मायना गेली. कार्यकर्ते जोशात नाचत होते. आपल्या डावाच्या घरापुढे आले कि एकेकाच्या अंगात मिथुनच येत होता. जरा उतरली कि बाजूला जायचे आणि दोन ग्लास एकाच दणक्यात संपवून पुन्हा मिरवणुकीत दाखल. त्यामुळे उत्साह कमी होण्याचा प्रश्नच नव्हता. "खली वल्ली खलि वल्ली खलि वल्ली' "येऊ कशी तशी मी नांदायला" मुंगळा " ह्या गाण्यांनी धुरुळा केलता. म्हातारी कोतारी पटके पाडोस्तोवर हातभट्टी मारून नाचत होती. एकूण आमची हवा झाली होती. रात्रीचे बारा वाजले. इंग्रजी माल संपला आणि कार्यकर्त्यांनी हातभट्टी मारायला चालू केली. कुणीच शुद्धीत नसण्याच्या अवस्थेत एका गावाबाहेरील विहिरीत गणेश विसर्जन झाले.

मिरवणूक विहिरी पर्यंत जाईपर्यंत निम्मे कार्यकर्ते पिवून रस्त्यावर आणि काही रस्त्याच्या कडेल शेतात पडले होते. त्यात लंगडा संत्या पण होता. दिवस उगवायच्या आधीच त्याची उतरली. डोळे चोळत गावाकडे बघितले आणि गावातून येणार्या आवाजांनी तो ताडकन उठला आणि गावाकड पळत सुटला.त्याचे आई, वडील, बहिण त्याच्या मातीच्या घराखाली गाडले गेले होते. अशी अनेक कुटुंबे गाडली गेली होती. भूकंपाने गावावर अवकळा आणली होती. संत्याने त्या मातीच्या ढिगार्याकडे बघितले, तिथेच जवळ असलेल्या गणपतीच्या रिकाम्या मंडपाकडे बघितले. त्याच्या आईवडिलाना गणपती वाचवू शकला नव्हता. त्याने आपल्या गळ्यातील गणपतीचा ताईत काढून त्याच्याकडे बघितले आणि तो ताईत दूर फेकून देऊन तो मातीचा ढिगारा उपसायला चालू केले. एकट्यानेच.






No comments:

Post a Comment