Sunday, March 22, 2015

गरुड घुबड

उंचच उंच लिंबाऱ्यांच्या झाडांनी व्यापलेलि एक जुनाट दगडी चिरेबंदी विहिर आहे.  त्या विहिरीच्या कडेला लिंबाऱ्यातून  उंच वरती निघून आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवणारा पिंपळ आहे. त्या पिंपळाची आणि लिंबाऱ्यांची पाने पडून विहिरीतील पाणी झाकून गेले आहे. कधी कधी एखादी धामीन किंवा इरुळा तोंड वरती काढून आपले अस्तित्व दाखवतात. बाकी पाणी शांत असते.  विहिरीच्या पायऱ्याच्या कपारीत खालच्या बाजूने घुबड आणि घुबडिनीचे घर आहे. विहिरीच्या कडेच्या त्या उंच पिंपळावर बसून रात्रीच्या चंद्र ताऱ्यांचा आस्वाद घेण्याचे काम गेले कित्तेक दिवस घुबड आणि घुबडिन करत आहेत.  कधीतरी चांदणे दाखवायला म्हणून आपल्या पिल्लांना पण ते पिंपळाच्या झाडावर घेऊन येत असत. रात्री दोन नंतर आणि पहाटे घुबड बाहेर पडुन अन्न जमा करून घेऊन येते. पिल्लांना पण त्यांचे आई बाबा खूप आवडतात. थोडक्यात घुबड घुबडीनींचा सुखाचा संसार चालू आहे. पण गेले काही दिवस उच्चवर्णीय गरुडाच्या चकरा विहिरीच्या दिशेने वाढलेल्या आहेत हे चाणाक्ष घुबडाच्या नजरेतून सुटलेले नाही. तो जरासा अस्वस्थ आहे, पण शांत आहे.  त्याला आपल्या पिलांची पण काळजी वाटतेय. गरुडाच्या वेळी अवेळी चकरा घुबडीनिच्या पण नजरेतून सुटलेल्या नाहीत. एके दिवशी घुबड घुबडिनीला सावध करते. "सखे तो गरुड जो वेळी अवेळी चकरा मारत आहे त्यापासून सावध रहा". त्यावर घुबडिन घुबडाला  अश्वस्त  करते. "काळजी नसावी सख्याहरी, अश्या लोकांना कसे वठणीवर आणायचे हे मला चांगले ठाऊक आहे" एके दिवशी घूबड अन्न जमा करण्यासाठी गेले असता गरुड येउन पिंपळावर बसून घुबडिनीच्या घरट्याकडे बघत बसतो. घुबडिन घाबरून आपल्या पिलांना पंखाखाली घेऊन बसते. तिची नजर वारंवार गरुडाकडे जात असते. तो जात पण नाही लवकर. काही वेळाने घुबड येत असलेले पाहून गरुड उडुन जातो. घाबरलेला गरुड येउन पाहतो सगळे व्यवस्थित असते. घुबड घुबडिनीची स्तुती करतो आणि तिच्या धैर्याची तारीफ करतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा घुबड अन्न गोळा करायला जाते. आता घुबडिनीच्या मनात गरुडाच्या रूपाविषयी विचार येत आहेत. त्याची ती अनुकुचीदार आणि शाही बाक असलेली चोच, त्याची ती लकबदार मान आणि आकाशाचा वेध घेणारे डोळे, त्याची उंची, त्याचा चालतानाचा रुबाब, उडतानाचा रुबाब, खरच गरुड हा देवकुळातील असला पाहिजे. घुबडीनीच्या मनात गरुडाविषयी भावना तयार होत होती. आपली पिल्ली गरुडा सारखीच व्हावी अशी भावना घुबडिनीच्या मनात येते. काही वेळाने आजून गरुड येउन पिपळाच्या झाडावर बसतो. आता तो घुबडिनीकडे बघतोय. घुबडिन घाबरते पण पहिल्या दिवसा इतकी नाही. आज गरुड घुबड येण्याच्या अगोदरच जाते. गरुड येतो, त्याला वाटते आज पण गरुड दिसेल म्हणून त्याच्या काळजात धस्स झालेले असते. पण गरुड दिसत नाही. आनंदाने घुबड जाते, घुबडीनीला आणि पिलाला खाऊ घालते. आसे काही दिवस चालते. घुबडाला गरुड दिसत नसल्याने त्याची चिंता मिटते. नेहमीप्रमाणे गरुड येतो, आज घुबडिन त्याला घाबरत नाही. गरुडावर घुबडिनीचा विश्वास बसलेला असतो. आणि घुबडिन गरुडाची स्वप्ने पण बघू लागलेली असते. आता तिला गरुडसारखीच पिल्ले हवी असतात. ती पिलांना सोडून दरवाजात उभी राहते. गरुड तिला उद्या नदीच्या पलीकडे असलेल्या एक देवळाच्या गाभाऱ्यात यायला सांगतो. शेवटी तो असतोच देवाचे वाहन. घुबडीन खुश होते. दुसऱ्या दिवसाची वाट बघू लागते. घुबड जेवण घेऊन येते पण तिची भूक मेलेली असते. ती उद्याच्या गरुडाबरोबरच्या भेटीची स्वप्ने बघण्यात दंग असते. दुसऱ्या दिवशी घुबड नेहमी प्रमाणे अन्न शोधण्या जाते. घाई झालेली घुबडिन अगोदरच देवळाकडे पळते. नदी वोलांडून, डोंगराच्या माथ्यावर असलेले ते पडीक आणि एकाकी देवूळ पौर्णिमेच्या चांदण्यात सुंदर दिसत असते. घुबडिन वाट बघत बसते. चंद्र उतरणीला लागतो तरी गरुड येत नाही. देवळाच्या त्या पडक्या पण सुंदर भिंतीवर बसून वाट बघून व्याकूळ झालेली घुबडिन निराश होऊन घराकडे निघते. घरी जाउन बघते तर एकही पिल्लू नसते. काही पिल्लांची पिसे आणि थोडेसे रक्त पडलेले असते. ते पाहून निराश झालेली घुबडिन तशीच बसून राहते. आता घुबडाला काय सांगावे म्हणून ती घाबरून तर गेलेलीच असते पण तिची पिल्ले पण गेली म्हणून दु;खी पण असते. घुबड येते. घरट्यात पाहते, त्याला कळते काय झालेय. घुबड म्हणतो, जाऊदे सखे, तू त्या गरुडाचा मुकाबला करू शकणार नव्हतीस, ह्यात तुझा काही दोष नाही, आपण आजून पिल्लांची निर्मिती करू. पण आता आपण घर बदलायला पाहिजे. आपल्याला पुनर्निर्मिती गरुडासाठी नाही करायची. घे दोन घास खाउन घे.









No comments:

Post a Comment